खरेदी-विक्री केंद्राच्या हिशोबात अफरातफर करून अडीच लाखांचा अपहार 

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथील खरेदी-विक्री केंद्रात हिशोबात अफरातफर करुन सुमारे 2 लाख 34 हजार 520 रुपयांचा अपहार केला.याप्रकरणी दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 फेब्रुवारी ते 12 जुलै 2020 या कालावधीत घडली असून याबाबत शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण कमलाकर पावसकर आणि आर्यन किरण पावसकर (दोन्ही रा.पावस बौध्दवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात संदीप यशवंत पावसकर (41,रा.पावस रोहिदासवाडी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, संदीप पावसकर यांचे पावस तांबळवाडी येथे मयुर मँगो सप्लायर्स नावाचे खरेदी-विक्री केंद्र आहे. या केंद्रात किरण पावसकर आणि त्याचा मदतनीस आर्यन पावसकर हे दोघे कामाला होते.या दोघांनी संदीप पावसकर हे गैरहजर असताना एकमेकांच्या संगनमताने हिशोबाच्या वहित खाडा-खोड करुन खोटा हिशोब दाखवून 2 लाख 34 हजार 520 रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली. दरम्यान, संदीप पावसकर यांची पत्नी आजारी असल्याने त्यांनी शनिवारी पूर्णगड पोलिसांकडे उशिराने तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.