खंडाळा येथे हार्डवेअरच्या गोडाऊनला आग लागून 14 लाखांची हानी

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेतील यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मध्ये ठेवण्यात हार्डवेअरचे सामान आणि इको गाडी पूर्णतः जाळून खाक झाली. या आगीत हार्डवेअरचे सामान आणि इको गाडी यांचे मिळून जवळपास 14 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती जयगड पोलिसांनी दिली.

याबाबत यामिनी हार्डवेअर दुकानाचे मालक मोहनलाल चौधरी यांनी जयगड पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. मोहनलाल चौधरी यांचे खंडाळा बाजारपेठेत हार्डवेअर दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूस त्यांचे घर असून या घराच्या पाठीमागे त्यांचे गोडाऊन देखील आहे. हार्डवेअर दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू मोहनलाल या गोडाऊन मध्ये साठवून ठेवत होते. यासह त्यांची चारचाकी देखील याच गोडाऊन मध्ये पार्क करून ठेवत होते.

रविवारी सकाळी मोहनलाल यांना त्यांच्या गोडाऊनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली. या परिसरात टेम्पो आणि टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी देखील आगीची माहिती कानावर पडताच आग विझवण्यासाठी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेएसडब्ल्यू आणि आंग्रे पोर्टच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

तब्बल दोन तासांपेक्षा अधिक कालावधी प्रयत्न केल्यानंतर आग काही प्रमाणात शांत झाली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी या आगीत मोहनलाल चौधरी यांच्या गोडाऊनमध्ये असलेले हार्डवेअरचे सामान आणि चारचाकी इको कार पूर्णतः जळून खाक झाले आहे. या आगीत मोहनलाल चौधरी यांचे अंदाजे 14 लाखांचे नुकसान झाले असून याबाबत जयगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.