रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बहुचर्चित वीर खूनप्रकरणातील आरोपी दर्शन शांताराम पाटील (वय ५७) यांना अखेर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ. म. अंबळकर यांनी २३ सप्टेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
या खून प्रकरणात दर्शन पाटील यांचा मुलगा दुर्वास पाटील हा मुख्य आरोपी असून तो इतर दोन खून प्रकरणातही सहभागी आहे. मृत सीताराम वीर यांच्या खुनाप्रकरणी दर्शन पाटील यांच्यावर कलम ३०२, २०१, १०९ सह ३४ भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली. सुरुवातीला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अहवालांनुसार, ते ‘मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम’ने ग्रस्त असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सरकारी वकिलांनी आरोपीला जामीन देण्यास तीव्र विरोध केला. त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपी जामिनावर सुटल्यास मुलाला मदत करण्याची शक्यता आणि साक्षीदारांना धोका पोहोचण्याची शक्यता यावर भर दिला. आरोपी वृद्ध असल्याने त्याला तुरुंगात निवांत जीवन जगता येईल, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला. दुसरीकडे, बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी दीर्घकाळ उपचाराखाली असून, नातेवाईकांना त्यांची काळजी घेताना अडचणी येत असल्याने मानवतावादी दृष्टिकोनातून जामिनाची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने दर्शन पाटील हे गंभीर आजारी असल्याचे मान्य केले. त्यानुसार, न्यायालयाने वैयक्तिक ५० हजार रुपयांच्या जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
यासोबतच, न्यायालयाने काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. आरोपीची प्रकृती सुधारल्यावर त्याने तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासात सहकार्य करणे, साक्षीदार आणि फिर्यादी यांच्याशी कोणताही संपर्क न साधणे आणि पुराव्यात छेडछाड न करणे बंधनकारक असेल. या आदेशाची प्रत जे. जे. रुग्णालयालाही पाठवण्यात आली आहे. या गंभीर आजारामुळे न्यायालयाने आरोपीला जामीन दिल्याने रत्नागिरीत या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.