खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरणात मोठा उलगडा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील बहुचर्चित वाटद-खंडाळा खूनप्रकरणाच्या तपासाला अखेर निर्णायक कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान काही मानवी हाडे आढळून आली असून, ही हाडे बेपत्ता असलेल्या राकेश अशोक जंगम याचीच असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर हाडे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असून, सीए अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबतची अधिकृत पुष्टी होणार आहे. ही हाडे राकेश जंगम याचीच असल्याचे निष्पन्न झाल्यास या गुंतागुंतीच्या प्रकरणातील तपासात पोलिसांना मोठे यश मिळणार आहे.

खूनप्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५, रा. कळझोंडी) आणि राकेश अशोक जंगम (वय २८, रा. वाटद-खंडाळा) या दोघांचाही खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वासच्या म्हणण्यानुसार, सीताराम वीर हे त्याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी मोबाईलवरून अश्लील संभाषण करत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

२९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम वीर हे दुर्वासच्या सायली बारमध्ये दारू पिण्यासाठी आले असता, दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि राकेश जंगम या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सीताराम यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राकेश जंगम याला दारूचे व्यसन असल्याने तो खुनाची वाच्यता करेल, अशी भीती दुर्वास पाटील याच्या मनात निर्माण झाली. या भीतीतूनच दुर्वासने राकेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ६ जून २०२४ रोजी कोल्हापूरला जायचे असल्याचे आमिष दाखवत दुर्वासने राकेशला कारमध्ये बसवले. कारने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सांगली येथील निलेश भिंगारडे यांनी कारमध्येच राकेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून देण्यात आला.

दरम्यान, राकेश घरी परत न आल्याने त्याची आई वंदना जंगम यांनी २१ जून २०२४ रोजी जयगड पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीनंतरही राकेशचा कोणताही ठोस सुगावा पोलिसांना लागला नव्हता. परिणामी, सीताराम वीर आणि राकेश जंगम या दोघांच्या खूनप्रकरणांचा उलगडा तब्बल वर्षभर रखडलेला होता.

भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या आंबा घाट परिसरात टाकण्यात आला होता, त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी राकेश जंगमचा मृतदेह फेकून देण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. भक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता; मात्र राकेशचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. अखेर पोलिसांनी त्या परिसरात पुन्हा कसून शोधमोहीम राबवली असता काही मानवी हाडे आढळून आली. ही हाडे नेमकी कोणाची आहेत, याबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच या रहस्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, तो अहवाल या बहुचर्चित खूनप्रकरणाच्या अंतिम उलगड्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.