रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा खून प्रकरणात मृत सीताराम वीर याला मारहाण झाल्यानंतरचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये वीर याच्या चेहऱ्यावर व पायावर मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. दुर्वास व त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून सीतारामचा खून केला होता. मात्र नातेवाईकांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने सीताराम याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र आता फोटो प्राप्त झाल्याने पोलिसांना तपासात मोठे यश आल्याचे बोलले जात आहे.
मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खूनाच्या तपासामध्ये संशयित दुर्वास पाटील व त्याच्या दोघा साथीदारांनी कळझोंडी येथील सीताराम वीर व राकेश जंगम यांचा खून केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली होती. २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम याच्या खूनाची घटना घडली होती. सुमारे दीड वर्षानंतर सीताराम याचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांपुढे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान, वाटद खंडाळा मारहाणीनंतर घरी आणलेल्या तिहेरी हत्याकांड सीताराम याचे एका व्यक्तीने फोटो काढून ठेवले होते. हे फोटो आता पोलिसांच्या हाती आल्यामुळे सीताराम याला मारहाण झाल्याचे शाबित करण्यासाठी महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यातील माहितीनुसार दुर्वास पाटीलचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध आहेत हे सीतारामला समजले होते. त्याने भक्तीशी ओळख वाढविण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळविला. यानंतर सीताराम हा भक्ती हिला सातत्याने फोन करत होता. सीताराम हा आपल्याला फोन करून त्रास देतो अशी तक्रार भक्ती हिने प्रियकर दुर्वासकडे केली. त्यानुसार सीतारामला अद्दल घडवायची असा इरादा दुर्वास याने केला. २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सीताराम दुर्वासच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. यावेळी दुर्वासने विश्वास पवार व राकेश जंगम याच्या मदतीने सीतारामला काठीने, हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात सीतारामचा मृत्यू झाला. त्याच अवस्थेत सीतारामला दुर्वास रिक्षाने त्याच्या घरी घेवून गेला. सीतारामला दारु पित असताना अचानक चक्कर आली असून तो बेशुद्ध झाला. अशी कथा दुर्वास याने सीतारामच्या नातेवाईकांना सांगितली.