क्रेडिट कार्डची खोटी माहिती सांगून दिड लाखांची फसवणूक

खेड:- अज्ञात भामट्याने ३१ ऑगस्ट रोजी क्रेडिट कार्डबाबत खोटी माहिती सांगून मोबाईलद्वारे तालुक्यातील पीरलोटे येथील ६० वर्षीय वृद्धाची १ लाख ५४ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत यल्लोजीराव सोंगाडी (वय ६०) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन त्यांना कॉल आला, समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमचा क्रेडिट कार्ड इंटर नॅशनल झाला असून त्यासाठी तुम्हाला दरमहा ६५०० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार, असे सांगून त्यांच्या मुलीच्या बँक खात्यातून रक्कम काढली. अज्ञात भामट्याने १ लाख ५४ हजार १११ रुपये ६१ पैसे काढून ऑनलाईन फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर सोंगाडी यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.