कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांवर सुरीने हल्ला

संगमेश्वर:- नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या मुलाला वडिलांनी समज देताच त्याचा राग येऊन मुलाने वडिलांवर सुरीने हल्ला केल्याची घटना नारडूवे पिंपळवाडी, संगमेश्वर येथे घडली आहे. आत्माराम गोपाळ राणे (वय ५० रा. पिंपळवाडी ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. 

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा मुलगा अमर आत्माराम राणे हा रोज दारू पिऊन शिवीगाळ करतो. तू दररोज दारू पितोस, फुकटचे जेवतोस, घरी येऊन तमाशा करतोस, तुझी बायका-मुले आहेत त्यांना पोसणार कोण ? असे मुलाला आत्माराम राणे यांनी विचारले असता त्याचा राग येत अमर वडिलांच्या अंगावर शिवीगाळ करीत धावून गेला व मारून टाकीन अशी धमकी देत धारधार सुरीने आत्माराम यांच्या डाव्या डोळ्याच्या वरती दुखापत केली. या मारहाणीत आत्माराम राणे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर पोलीस स्थानकात भा.दं.वि.क. ३२४,३२३,३५२,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार चंद्रकांत कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.