रत्नागिरी:-कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेड्स व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्ससह अन्य सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्या ठिकाणी ऑक्सीजन निर्माणीस सुरुवात करावी असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 खाटांच्या समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी यांची उपस्थिती होती.
अगदी 8 दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करुन आता जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेतर्फे खास महिला व लहान बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार ही निश्चित चांगली बाब आहे. सोबतच आपण ऑक्सिजनची उपलब्धता जरुर ठेवा असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1200 मेट्रीक टन आणि मागणी 1700 मेट्रीक टन अशी स्थिती दुसऱ्या लाटेत निर्माण झाली. त्यामुळे इतर ठिकाणांवरुन ऑक्सिजन आणावा लागला अशी स्थिती यापुढे येणार नाही याची खबरदारी घ्या. कोविडचा मुकाबला करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. म्युकर मायकोसिस हा कोविडमधील औषधांमुळे होणारा आजार आहे. यासाठी याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याकरिताच माझा डॉक्टर ही संकल्पना महत्वाची आहे असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हयात रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर आणि मोठया प्रमाणावर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास जिल्हा पूर्णपणे तयार आहे असे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आपल्या भाषणात सांगितले.









