रत्नागिरी:- कोविडच्या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार व्हावेत यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला 26 व्हेंटीलेटर केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत. नुकतेच हे व्हेंटीलेटर प्राप्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
कोवीडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना अनेक वेळा व्हेंटीलेटरची संख्या कमी असल्याने जिल्ह्यात मर्यादा येत होती. जिल्ह्यात अवघे 43 व्हेंटीलेटर होते. त्यातही शासकीय संख्या अगदीच कमी होती. त्यानंतर काही कंपन्यांनी व्हेंटीलेटर पुरवल्याने काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेला मदत झाली होती. मात्र आणखी व्हेंटीलेटरची आवश्यकता होती. यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे व्हेंटीलेटरसाठी प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने त्यानंतर केंद्राकडे याबाबत मागणी केली होती. 24 ऑगस्ट रोजी व्हेंटीलेटर रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. यातील 10 व्हेंटीलेटर महिला रुग्णालय, 3 व्हेंटीलेटर कामथे उपजिल्हा रुग्णालय, 3 व्हेंटीलेटर दापोली उपजिल्हा रुग्णालय तर 10 व्हेंटीलेटर जिल्हा शासकीय रुग्णालयांना वाटप करण्यात आले.
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यू दर अधिक आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील मृत्यू दर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटीलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी श्री. टोपे यांनी प्रयत्न केले होते. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. 124 रुग्ण मृत्यू पावले असून त्यातील 70 टक्के रुग्ण हे 60 वर्षावरील आहेत. तरुण कोरोना बाधित मृत्यूचा टक्का कमी आहे. परंतु अधूनमधून अशा घटना घडत आहेत. एखादा रुग्ण गंभीर झाला तर उपलब्ध व्हेंटीलेटरच्या माध्यमातून उपचार करणे शक्य होणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.









