रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ऑगस्ट 2021 मधील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुह्यातून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य दोन आरोपींची 29 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत रत्नागिरीत केंद्रीय सूक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होती. यावेळी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहीत असतानाही मास्कचा वापर न करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, या कारणास्तव तत्कालीन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे आदेश (दि. 24/08/2021) आणि ‘ब्रेक द चेन‘ (दि. 17/08/2021) च्या सुधारीत आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी भाजपो नेते प्रमोद जठार (माजी आमदार), संकेत बावकर आणि प्रफुल्ल पिसे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 269, 34 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे सरकारी पक्षातर्फे फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गुणदोषावर सुनावणी होऊन 29 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी वर्ग एक, रत्नागिरी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. माजी आमदार प्रमोद जठार यांच्यातर्फे अॅड. महेंद्र मांडवकर, अॅड. उमेश जोशी आणि अॅड. ममताबेन मुद्राळे यांनी यशस्वीरित्या बाजू मांडली. पुराव्याअभावी न्यायालयाने तिन्ही आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. यामुळे, रत्नागिरीतील या बहुचर्चित प्रकरणावर पडदा पडला आहे.