कोरोना नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांतील शहर आणि परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्याप स्थिर असून रुग्णसंख्येत वाढ दिसली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी तयारी रुग्णालय स्तरावर करण्यात येत आहे. आता कोरोनाच्या संभाव्य रुग्णवाढीचा सामना करण्यासाठी आपत्ती निवारणार्थ कोकणातील  सर्व  जिल्ह्यात सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार असलेल्या बीएफ. 7 मुळे चीन, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स अशा प्रमुख देशांमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या चर्चेत असलेल्या बीएफ. 7 या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा संसर्ग भारतात अद्याप अत्यल्प प्रमाणात असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयांकडून सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. सर्व रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा, औषधे, उपकरणे, प्राणवायू यांचा पुरेसा पुरवठा, रुग्णसंख्येत वाढ दिसल्यास त्यानुसार योग्य निर्णय घेण्यासाठी ही प्रात्यक्षिके आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. सद्यस्थितीत त्याची आवश्यकता भासण्याची शक्यताही कमी आहे. मात्र खबरदारी आणि सावधगिरीसाठी या मॉक ड्रिल घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. सध्या कोकणात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने याबाबत गंभीरपणे सक्तीची प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.