कोरोनापासून बचावासाठी नाकावाटे घ्यायची लस रत्नागिरीत उपलब्ध

रत्नागिरी:- सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने नाकावाटे घ्यावयाची लस उपलब्ध करून दिली आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमात नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचा वापर सुरु करण्याबात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून या लसीचा साठाही प्राप्त झाला आहे.

नागरिकांच्या सुरूक्षिततेसाठी सद्यस्थितीत फक्त ६० वर्षावरील नागरिकांना इन्कोव्हॅक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ज्या नागरिकांचा दुसरा डोस कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन घेऊन सहा महिने पूर्ण झालेले आहेत असे लाभार्थीच इन्कोव्हॅक लसीच्या प्रिकॉशन डोससाठी पात्र असतील. तालुक्यात लसीकरण सत्रांच्या ठिकाणी हे प्रिकॉशन डोस घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी केले आहे. प्रशासनाले रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 50 डोस, लांजा ग्रामीण रुग्णालय 20, राजापूर ग्रामीण रुग्णालय ३०, चिपळूण नागरी आरोग्य केंद्र 50, गुहागर ग्रामीण रुग्णालय 10, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय 20, देवरुख ग्रामीण रुग्णालय 30, उपजिल्हा रुग्णालय दापोली 40, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 40, नगर परिषद दवाखाना खेड 10, ग्रामीण रुग्णालय मंडणगड 10 डोस उपलब्ध आहेत.