रत्नागिरी:- यंदा कोरोनामुळे अनेक मार्केट बंद होती. तरीही खासगी विक्रीमुळे कोकणातील आंबा उत्पादक तरले. नियमन मुक्ती नसती तर काय झालं असतं याचा विचार करणेच अशक्य आहे. त्यामुळे कृषी विधेयकातून शेतकरी खर्या अर्थने मोकळा झाला आहे. कोरोना संकटाने आपल्या सर्वांना नवीन मार्केटिंग शिकवलंय त्याचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेत सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केली.
केंद्र शासनाने आणलेल्या नवीन कृषी धोरणावरुन सध्या राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या धोरणाचा अवलंबच होऊ नये यासाठी राज्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून विरोधात भुमिका घेतली जात आहे. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांसह विविध शेतकर्यांचा नवीन कृषी विधेयकामुळे काय लाभ होऊ शकतो याबाबत डॉ. भिडे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, वर्षाआधी महाराष्ट्र शासनाने नियमन मुक्ती केली, कोकणातील अनेक छोटे शेतकरी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे जाऊन आंबा विकू लागले आहे. यंदा तर कोरोनामुळे अनेक मार्केट बंद होती. आंबा उत्पादनही कमी होते. तरीही खासगी विक्री करून आंबेवले तरले. हे सत्य नाकारता येत नाही. जर नियमन मुक्ती नसती तर काय झालं असत, कुणाची बाजू घेणे हा विषय व्यवहारात आलेले निकाल काय सांगतात यावरच अवलंबून आहे. कृषी विधेयकातून शेतकरी खर्या अर्थने मोकळा झाला आहे. नवीन पिढीने नव्या विक्री संकल्पना घेऊन या संधीचं सोन केले पाहीजे. कोरोना संकटाने आपल्या सर्वांना नवीन मार्केटिंग शिकवलंय. तेव्हा चर्चा करण्यापेक्षा संधीचे सोन केले पाहीजे. यामध्ये एक वेगळा फायदाही दिसून येतो तो म्हणजे खासगी मार्केटिंग सुरु केले की स्वाभाविक प्रस्थापित मार्केटवर येणारा लोड कमी होईल. जे शेतकरी तिथे माल पाठवतील, त्यांचे दर टिकून राहतील. मार्केटस नेहमीप्रमाणे 10 ते 15 एप्रिलला ओव्हरफ्लो होणार नाहीत. आपल्या ओळखीच्या शेतकर्यांना जीआय घ्यायला प्रवृत्त करा आणि ब्रॅण्डिंगचे महत्व समजावून घेतले पाहीजे.









