कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी होऊ शकतो पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांनी क्वारंटाईनचे निकष पाळले नाहीत आणि गणेशोत्सवानंतर देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिल्यास कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन केला जाऊ शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला माहिती देण्यासाठी आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला माहिती देताना ते बोलत होते. एका ग्रामस्थाने गणेशोत्सवानंतर लॉकडाऊन वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यानी नियम पाळून गावात रहावे. शासनाने आखून दिलेले धोरण पाळा. गावकर्‍यानी देखील चाकरमान्यांना मदत करावी. नियम पाळले न गेल्यास आणि गणेशोत्सवानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास सात दिवसांचा लॉकडाऊन केला जाऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही यासाठी सर्वांचे योगदान मौल्यवान असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.