रत्नागिरी:- कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा प्रलंबित मागण्यांची दखल कोकण रेल्वे घेत नाही, म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृतीसमितीने वेळोवेळी दाद मागितली. पण ते प्रश्न तडीस नेण्यात येत नाहीत. त्यामुळे कृती समितीतर्फे मंगळवारी रत्नागिरी रेल्वेस्थानकासमोर मंगळवारी (ता. 8) आंदोलन केले. प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास पुढील आंदोलन हे रेल रोको करु असा इशाराही यावेळी दिला.
कोंकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीने वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात पत्रव्यवहार केले होते. संबंधित अधिका-यासोबत सभा लावण्यासाठी सांगण्यात आले. परंतु कोकण रेल्वे कार्यालयाकडून दुर्लक्ष झाले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात कृती समितीने दिलेल्या पत्रव्यवहाराच्या बाबतीत वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. 1 ते 5 जुलै 2019 दरम्यान रत्नागिरीत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींसाठी समितीच्या मागणीनुसार घेण्यात आलेल्या शिबिरातील प्रश्नांची ठराविक पद्धतीने उत्तरे पाठवून कोरे अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा उपहास करत आहे. या संदर्भात त्वरित बैठक बोलवावी. तसेच लोटे परशुराम (चिपळूण) येथे होत असलेल्या रेल्वे कारखान्यात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे. 201 उमेदवारांची वैद्यकीय, रिटन, तोंडी मुलाखती झालेल्यांचे पूर्णतः शंकानिरसन झालेले नाही. आपणांकडून घेण्यात आलेल्या शिबिरात कोणतीही फाईल उपलब्ध नाही व प्रकल्पग्रस्तांना लिहून दिलेल्या साध्या फॉर्मवरती सर्वांना एकच उत्तर पत्राद्वारे दिले. या समस्या सोडवण्यासाठी शिबिर लावावे अशी मागणी कृती समितीने उचलून धरली आहे. या प्रश्नी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या आवाहनानंतर कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे 8 मार्च 2022 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे उपोषण झाले. यावेळी विविध संघटना प्रतिनिधीनी भेट देऊन कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात कामगार सेनेचे (कोकण रेल्वे) किशोर सावंत व विलास खेडेकर, शेतकरी कामगार संघटना अशोक जाधव, भारतीय जनता पार्टी रत्नागिरी योगेश मगदुम, बाळ माने, सौ. ध्रुवी लाकडे, अमित देसाई, पिंट्या निवळकर, केआरसीई युचे उमेश गाळवणकर यांचा समावेश होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व कृती समती अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सुरेश गावडे, वसंत धुरी, सुरेंद्र कळंबटे, प्रतीक्षा सावंत, वेदिका सावंत, मयूर जाधव, चंद्रकांत जाधव यांनी केले.