कोरे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा 10 वर्षांनी वाढवा 

रत्नागिरी:- एमपीएससी आणि तत्सम परिक्षांसाठी शासन वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेत आहे. त्या धर्तीवर कोकण रेल्वेनेही प्रकल्पग्रस्तांसाठी 10 वर्षांनी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. कोकण रेल्वे एम्प्लॉईज निवडणुका पार पडल्यावर हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही समितीने केली आहे.

कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सदैव कोकण रेल्वे समोर मांडूनही अजून सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही आहे; मात्र त्यासाठी लढा कायम सुरु आहे. कोरोना संकटामुळे आणि चुकीच्या नियमांमुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांची वयाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार ज्याप्रमाणे सर्वांना सामावून घेण्यासाठी एमपीएससी आणि तत्सम परिक्षांसाठी वयोमर्यादा वाढवत आहे. त्या धरतीवर कोकण रेल्वेनेही प्रकल्पग्रस्तांसाठी 10 वर्षांनी वयोमर्यादा वाढवावी . अशी मागणी सर्व प्रकल्पग्रस्त करत आहेत. कोकण रेल्वेत एनआरएमयु ची संघटना अनेक वर्षे सत्तेत होती. कोकण रेल्वे प्रशासनाला स्थानिक भरती करताना त्यात अवांतर व्यक्तींना स्थान द्यावे लागत असल्यामुळे कोकणी माणसांची स्वतःची युनियन असेल तर कोकण रेल्वेत कोकणी माणसांच्या स्थान कोणीही हिरावून घेवू शकत नाही. त्यासाठी सामान्य कोकणी माणसाला न्याय देणारी संघटना सत्तेत येणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे कामगार संघटनाची निवडणुक येत्या चार दिवसात होणार आहे. त्या निवडणुकीत कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियन आणि कोकण रेल्वे कामगार सेना एकत्रपणे लढत आहे. त्यांच्याकडून भरतीचा प्रश्‍न सोडवला गेला तर नक्कीच कोकणी लोकांना फायदा होईल.