कोमात गेलेल्या जीवन प्राधिकरणाला 410 कोटींच्या कामाचा बूस्टर डोस

रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नव्याने मिळालेल्या पाणी योजनांच्या कामांनंतर आता ‘बुस्टर डोस’ लाभलेला आहे. गेल्या दोन वर्षात रत्नागिरी येथील या कार्यालयामार्फत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सुमारे 410 कोटीं 58 लाखांच्या 12 योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी आतापर्यंत 63 कोटी 24 लाख कामांवर खर्ची पडले असून त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मार्च 2024 पर्यंत ही कामे मार्गी लावण्याची मुदत देण्यात आली असल्याचे येथील विभागाकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आता अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे मागील काळात अशक्त बनलेले प्राधिकरण आता सशक्त होउ लागलेले आहे. एकेकाळी विदर्भ मराठवाड्यातील कार्यालयांवर अवलंबुन राहावे लागणारे हे रत्नागिरी कार्यालय आता मजबूत आणि भक्कम होऊ लागले आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये या कार्यालाने जिल्ह्यातील 178 कोटीच्या पाणी योजनांची कामे केली. त्यापैकी बहुतांशी कामे पुर्ण झाली तर काही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे या कार्यालयाकडे सध्या प्रचंड काम असून आणखी काही योजना या कार्यालयाच्या पदरात पडल्या आहेत. त्या कामांवर गतीने कार्यवाही सुरू आहे.

त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जयगड प्रादेशिक टप्पा 2 पाणीपुरवठा योजना (भाग 1) कळझोंडी धरण, जयगड पादेशिक टप्पा 2 पाणीपुरवठा योजना (भाग 2), पंपींग मशिनरी अशा कामांचा समावेश आहे. ही पाणी योजना 3383.01 कोटींची आहे. या योजनेच्या कामाला 2022 मध्ये पारंभ झालेला असून कळझोंडी धरणाच्या बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. निवीदा कालावधीनुसार डिसेंबर 2024 पर्यंत हे काम करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत या योजनेच्या कामावर 957.68 कोटींचा खर्च झालेला आहे. टप्पा 2 मधील सरासरी 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर पंप संचाचा पुरवठा करण्यात आला असून कलेक्टींग विहीरीचे काम पूर्ण हाताच पंप बसविण्याच्या काम हाती घेतले जाणार आहे.

संगमेश्वर तालुक्यासाठी प्रादेशिक पाणी योजना सुमारे 11 कोटी 59 लाखाची ही योजना आहे. येथील 9 हजार 464 लोकसंख्येचा विचार करून ती तयार केली आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे 6 कोटी 23 लाख खर्च झाला आहे. योजनेचे काम देखील प्रगतीपथावर असून सरासरी 65 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य संतुलन टाकीची जागा उपलब्ध होताच त्याचे काम पूर्ण करून मार्च 2024 पर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. गुहागर तालुक्यातील धोपावे पाणीपुरवठा योजना सुमारे 5 कोटी 34 लाखाची असून आतापर्यत 1 कोटी 38 लाख खर्च झाले आहेत. सरासरी 35 टकके काम पूर्ण असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
राजापूर तालुक्यातील पांगरी बुद्रुक ही सुमारे 25 कोटी 65 लाखाची योजना आहे. त्यामध्ये सुधारणा करून 14 गावांतील 12 हजार 217 लोकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे 6 कोटी 60 लाख खर्च झालेला आहे. योजनेचे सरासरी 24 टक्के कामाची प्रगती असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

चिपळूणमधील वाशिष्टी खोरे कोळकेवाडी ग्रॅव्हिटी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुमारे 106 कोटी 85 लाखांची आहे. आतापर्यंत या योजनेच्या कामावर सुमारे 4 कोटी 50 लाख खर्च झालेले आहेत. हे काम 20 टक्के इतके पगतीत असून सद्यस्थितीत इतर कामेही पगतीत आहेत. सावर्डे पाणीपुरवठा योजना सुमारे 16 लाख 96 लाखांची आहे. आतापर्यंत या योजनेवर सुमारे 2 कोटी 2 लाख खर्च झाले आहेत. योजनेचे काम पगतीत असून सद्यस्थितीत जॅकवेलचे व उर्ध्वनलिकेचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्याचबरोबर दापोलीमधील हर्णे पादेशिक पाणीपुरवठा योजना सुमार 28 कोटी 84 लाखांचे काम असून योजनेवर 10 कोटी 9 लाखांचा खर्च झालेला आहे. योजनेतील साठवण टाक्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्य गुरुत्ववाहिनीचे कामही सुरू आहे. जालगाव ब्राम्हणवाडी योजना सुमारे 19 कोटी 16 लाखांची असून या योजनेवर आतापर्यंत सुमारे 3 कोटी 13 लाख खर्च झालेले आहेत. त्यातून विहीरीचे व साठवण टाकीचे काम हाती घेण्यात आली आहेत. पालगड योजना सुमारे 5 कोटी 32 लाखांची असून आतापर्यंत 2 कोटी 87 लाख खर्च पडले आहेत. योजनेचे काम प्रगतीपथावर असून सरासरी 70 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मार्च 2024 पर्यंत ही पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. बुरोंडी पाणी योजना सुमारे 8 कोटी 47 लाखांची असून योजनेवर सुमारे 1 कोटी 5 लाखांचा खर्च झालेला आहे. त्यातून विहीरीचे व साठवण टाकीची कामे हाती घेण्यात आली आहेत.