रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील पोस्ट ऑफिसची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रय़त्न केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) सायंकाळी सव्वा पाच ते रविवारी (ता. १०) सकाळी अकराच्या मुदतीत कोतवडे येथील पोस्ट ऑफिस मध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपडाकपाल पोस्ट ऑफिस कोतवडेच्या सौ. मृण्मयी महेश महामुनी (वय ५३, रा. वैभव कोपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, उत्कर्षनगर-कुवारबाव, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शनिवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी अकराच्या मुदतीत चोरट्याने कोतवडे पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरी असलेल्या ट्रेझरी रुमच्या दरवाजाचे कुलप तोडून कोणत्यातरी धार हत्याराने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही मुद्देमाल गेला नाही. या प्रकरणी सौ. मृण्मयी महामुनी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.