कोतवडे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

उंबरवाडी परिसरात खळबळ

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शैलेश रविंद्र पवार (वय ३७) हा आपल्या आई-वडिलांसोबत कोतवडे उंबरवाडी येथे राहत होता. त्याचे वडील रविंद्र गणपत पवार हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८ वाजता गवंडी कामासाठी सडये गावी गेले होते, तर त्याची आई अंगणवाडीत गेली होती. यावेळी शैलेश हा घरामध्ये एकटाच होता.

दुपारी आई अंगणवाडीतून घरी परतली असता घराचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असल्याचे तिला दिसले. काही वेळातच वडील रविंद्र पवार हे देखील कामावरून घरी परतले. त्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला असता, हॉलमध्ये लाकडी वाशाला (बाराला) दोरीच्या साहाय्याने शैलेशने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले.

​या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मुलाच्या मृत्यूने पवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शैलेशने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.