रत्नागिरी:- एमटीएनएल सिमकार्डची कागदपत्रे व्हेरिफाय करायची बतावणी करत वृध्दाच्या बँक खात्यातून सुमारे 50 हजार रुपये काढून ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा.कोतवडे येथे घडली.
याबाबत मिलिंद निळकंठ देउस्कर (60, रा.गावणवाडी कोतवडे, रत्नागिरी) यांनी शनिवार 20 नोव्हेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, मंगळवारी सायंकाळी ते घरी असताना त्यांना अज्ञाताचा फोन आला. बोलणार्याने मी बांद्रा येथील एमटीएनएल ऑफीसमधून बोलत असून तुमच्या नावे असलेल्या सिमकार्डची कागदपत्रे व्हेरिफाय करायची असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत देउस्कर यांनी त्याला सिमकार्डबाबत सर्व माहिती दिली.त्यानंतर त्याने देउस्कर यांना एक लिंक पाठवली. ती लिंक पाहिल्यावर मिलिंद देउस्कर यांना त्यांच्या बँक खात्यातून 49 हजार 310 रुपये काढण्यात आल्याचे समजले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देउस्कर यांनी बँकेतून सर्व माहिती घेतल्यानंतर शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगताप करत आहेत.