कोतवडे खून प्रकरण; संशयित आरोपीच्या बँक खात्यातून लाखोंचे व्यवहार

रत्नागिरी:- कोतवडे घारपुरेवाडी (ता. रत्नागिरी) येथील तरुणाच्या खून प्रकरणात आरोपीच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे समोर आले आहे. तसेच संशयित आरोपी ऋषीकेश सनगरे याने खूनात वापरलेली बंदुक संदीप कुमार छोटेलाल यादव याच्याकडून विकत घेतल्याचा आरोप आहे. या बंदुकीसाठी बँक खात्यातून ३५ हजारांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हा एक महत्वाचा पुरावा या खटल्यामध्ये महत्वपूर्ण मानला जात आहे.

भिकाजी कृष्णा कांबळे (४३, रा. मारगांबेवाडी कोतवडे) याचा १८ एप्रिल २०१९ रोजी बंदुकीने गोळ्या घालून खून केला होता पोलीस तपासात ऋषीकेश विजय सनगरे (२१, रा. सनगरेवाडी, कोतवडे) यांनेच हा खून केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आहे. सरकारी पक्षाकडून अॅड. पुष्पराज- शेट्ये न्यायालयापुढे युक्तीवाद करत आहेत.

भिकाजी रंगकाम करणारे ठेकेदार म्हणून परिचित होते. भिकाजी यांच्या मुलीसोबत ऋषीकेश याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र या लग्नाला भिकाजी यांनी विरोध दर्शवला होता. १८ एप्रिल २०१९ रोजी भिकाजी कांबळे रस्त्याने घरी एकटे निघाले असताना गावठी, बंदुकीतून त्यांच्या छातीवर गोळी झाडली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे संदीप कुमार छोटेलाल यादव व चंदनकुमार कुशवाह यांच्याविरूद्ध देखील बंदुक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला असून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहेत.