पोलीसांचे सात पथके,तीन अधिकार्यांसह १५ अंमलदारांचा सामावेश
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील लावगणवाडी येथील बौद्धवाडीच्या स्मशानाजवळील आंब्याच्या बागेत गावातीलच दिलीप रामाणे (वय सुमारे ६० ) यांचा मृतदेह चेहरा विद्रूप केल्याच्या अवस्थेत आढळून आल्यानंतर पोलीसांनी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामाणे यांची हत्या गावातीलच व्यक्तीने केल्याचा संशय वाढला असून पोलीसांनी सात स्वतंत्र पथके तयार केली आहेत. त्यांच्यामर्फत शनिवारी दिवसभर पोलीस गावाताच आरोपीचा शोध घेत होते. चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये एका गावठी दारु विक्रेत्यांचा सामवेश आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायत हद्दीतील लागणवाडी येथे राहणारे दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी दिवसभर त्यांना गावातील ग्रामस्थांनी पाहिले होते,परंतु शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात असताना बागेत त्यांना दिलीप रामाणे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले होते. परंतु त्यांचा चेहरा विद्रूप झालेला असल्याने घातपताचा संशय होता.मात्र उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , ग्रामीण पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्राथमिक पहाणीत दिलीप रामाणे यांची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मध्यरात्री पोलीसांनी अज्ञात व्यक्तींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सायंकाळी दिलीप हा दारु पिण्यासाठी नाजिकच्या अडयावर गेला होता. त्याच्या समावेत असणारे दोघेजण तो निघण्यापुर्वीच येथून बाहेर पडले होते. तर दिलीप हा दारु पिवून झाल्यानंतरच एकटाच घरी येण्यासाठी निघाला होता. दरम्यान जेथे त्यांची हत्या झाली. येथे नेमकी काय घटना घडली याचा शोध पोलीसांनी सुुरु केला आहे. उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विविध पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.त्यामध्ये ३ पोलीस अधिकारी व १५ अंमलदारांचा समावेश आहे. यापथकाद्वारे शनिवारी दिवसभर कोतवडे लावगणवाडी परिसर पोलीसांनी पिंजून काढला आहे. तर हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दगड पोलीसांनी जप्त केला आहे.
दिलीप रामाणे याच्या हत्येचा तपास सुरु करण्यात आला असून पुर्वी असलेल्या वादाचाही तपास केला जात असून स्थानिक ग्रामस्थांची पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. सर्व दिशेने पोलीसांनी तपास सुरु ठेवला आहे. मात्र अध्याप तपासाची योग्य दिशा ग्रामीण पोलीसांना मिळालेली नाही.