कोरे मार्गावरील वेर्णा-कारवार विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गांवरील वेर्णा-कारवार दरम्यान विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु असून इलेक्ट्रिक इंजिनची दुसरी चाचणी दोन दिवसांपुर्वी घेण्यात आली. हा टप्पा लवकरत लवकर पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या याच टप्प्यातील टनेलमधील कामांसाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी 2 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
विद्युतीकरणाच्या कामा अंतर्गत रत्नागिरी ते वेर्णा दरम्यानचे काम वेगाने केले जात आहे. ते काम पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग विद्युतीकृत होईल. गतवर्षी रोहा-रत्नागिरी हा रेल्वे मार्ग विजेवर चालणार्या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे. परंतु जोपर्यंत संपूर्ण मार्ग विद्युतीकरणासाठी सज्ज होत नाही, तोपर्यंत डिझेल इंजिनचा वापर केला जात आहे. सध्या या मार्गांवर मालगाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत.
कोकणी जनतेचे स्वप्न पूर्ण करणारी कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. प्रवासी गाड्यांऐवजी सुरवातीला काही काळ मालगाड्यांची वाहतूक विद्युत इंजिने लावून केली जाणार आहे. त्यानंतर प्रवासी गाड्यांना विजेवर चालणारी इंजिने लावली जातील. विद्युत इंजिने काम करतील तेव्हा कार्यपद्धतीत बदल झाल्याने काही धोके निर्माण होणार आहेत. त्याचा विचार करून कोकण रेल्वेने जागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरी वेर्णा दरम्यान मार्गातील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. त्यासाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पुढे मंडगावकडे नेण्यात येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 12 जानेवारीला रत्नागिरी ते वेर्णा मार्गावर विद्युती ट्रेन चालवण्याची दुसरी चाचणी घेण्यात आली. यामधील त्रुटी किंवा दुरुस्त्या येत्या काही दिवसात पूर्ण केल्या जातील. त्यानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचा मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरु असून भविष्यावर रेेल्वे यावरच धावणार आहे. हा मार्ग जंगलातून गेला आहे. वन्यपशू आणि माकडे यांच्यामुळे विद्युत प्रवाह खंडीत (वायर ट्रिपिंग) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडीत झाला की गाडी 100 मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्चित करुन तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. इंजिन फेल्युअर झाले तर पिगबॅक करायला बॅकअप डिझेल इंजिनही लागेल. यादृष्टीने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.