खेड:- कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणार्या कोच्युवेली-एलटीटी एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेच्या पावणेपाच लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची घटना आंजणी रेल्वेस्थानकात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुपूर गोविंद वंझारे (मालाड पूर्व मुंबर्ई) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्या कोच्युवेली-एलटीटी एक्स्प्रेसमधून बोगी नंबर 76 च्या आरक्षण केलेल्या डब्यातून प्रवास करत होत्या. ही एक्स्प्रेस आंजणी स्थानकात थांबली असताना त्या झोपलेल्या असल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये 15 हजार रुपये किंमतीच्या ओपो कंपनीच्या मोबाईलचाही समावेश आहे. कोकण मार्गावरील मडगाव-नागपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेची अज्ञाताने पर्स हिसकावून साडेतीन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह पलायन केले होते. ही घटना ताजी असतानाच मांडवी एक्स्प्रेसमधून महिलेचेही पावणेतीन लाखाचा ऐवज असलेली पर्स लांबवली होती.