कोकण रेल्वे मार्गावर कारवार ते मडगाव सीआरएस चाचणी

विद्युतीकरणाचे आणखी एक पाऊल 


रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गांवर कारवार ते मडगाव दरम्यान ७२ किलो मीटरच्या सेक्शनमध्ये झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली. हा मार्ग आता विजेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी सज्ज झाला असून रोहा ते रत्नागिरी पाठोपाठ आणखी एक टप्पा विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे.


कोकण रेल मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. चारशे किमी मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यातील रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे 42 किमी चे काम पूर्ण झाले असून एक पॅसेंजर विजेवर धावू लागली आहे. त्या पुढील रत्नागिरी ते मडगांव या टप्प्याचे काम ही वेगाने चालू आहे. या मार्गावरील पहिली चाचणी ही केली गेली असून उर्वरित दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.  या मार्गावरील तिसऱ्या टप्प्याचे म्हणजेच  मडगांव थिवी दरम्यान सिएसआर चाचणी घेतली जाणार आहे. मध्य सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनीही या कामाची तपासणी केली. लवकरच रत्नागिरी ते थिवी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेचा पूर्ण मार्ग विजेवर धावणाऱ्या गाड्या चालवण्यासाठी खुला होणार आहे.

आरंभी विद्युतीकृत मार्गांवर मालगाड्या चालवल्या जातील आणि त्यानंतर पुढे पॅसेंजर चालवण्यात येतील. या कामासाठी अकराशे कोटी रुपयांचा खर्च कोकण रेल मार्गांवर केला जाणार आहे. संपूर्ण मार्गावरील काम येत्या काही महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.