कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे स्वप्न सात वर्षांनी पूर्ण

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक परिस्थितीत सुरु केलेले विद्युतीकरणाचे काम अखेर सात वर्षांनी शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास येत्या काही दिवसात वेगवान आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. सहा टप्प्यातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाले असून टप्प्याटप्प्याने विजेवरील गाड्या धावण्यास सुरवात होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भारतीय रेल्वेचे शंभर विद्युतीकरण मिशन – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग प्रदान करण्यासाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकार रेल्वे विद्युतीकरणातून हरित वाहतुकीचा टप्पा पूर्ण करत आहे. त्यात कोकण रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग ७४१  किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाची एकूण किंमत १ हजार २८७ कोटी रुपये आहे. त्यानंतर कोरोना काळातही काम थांबणार नाही याची काळजी घेत हा प्रकल्प सुरु होता. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च २०२० पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. रत्नागिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या विभागाची सीआरएस तपासणी २४ मार्चला झाली. त्याचा अहवाल २८ मार्चला अधिकृतरित्या रेल्वे सुरक्षा विभागाकडून प्राप्त झाला. कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि अनुकूल वातावरण यामुळे विद्युतीकरण प्रकल्प हे रेल्वे प्रशासनापुढे आव्हानात्मक होते. मात्र त्या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळ्यात तीव्र पडणार्‍या पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली आहे.
दरम्यान, गोव्याकडील भागातील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले. सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या नव्वद किलोमीटर च्या भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे टनेल या मार्गावर असल्यामुळे त्यामध्ये विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते.