कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण काही तासात फुल्ल

रत्नागिरी:- कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली आहे. कोकणात जाणार्‍या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात तिनशेच्याही पुढे गेली आहे. येत्या 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने 72 विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्या 5 सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागल्याची माहिती पुढे आली आहे.
गेल्या वर्षी 184 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु 14 दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे अनेकांनी आठ ते दहा दिवस आधीच खासगी वाहनांनी कोकण गाठले. त्यामुळे कोकण रेल्वेला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा कोकण रेल्वेने 72 विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला 8 जुलैपासून सुरुवात झाली. सीएसएमटी ते सावंतवाडी (01227) 5 सप्टेंबरपासून दररोज धावणार आहे. या गाडीच्या शयनयान श्रेणीला (स्लीपर क्लास) 5 सप्टेंबरला 81, तर 7 सप्टेंबरला 363 आणि 9 सप्टेंबरला 399 अशी प्रतीक्षा यादी आहे. आसन श्रेणीसाठी 7 सप्टेंबरला 260 प्रतीक्षा यादी असून 8 आणि 9 सप्टेंबरला तिकीटच उपलब्ध नसल्याचे दाखवले जात आहे. गाडी क्रमांक (01231) पनवेल ते सावंतवाडी’ आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. 7 सप्टेंबरपासून धावणार्‍या या गाडीची आसन श्रेणीतील प्रतीक्षा यादी 186 आणि 8 सप्टेंबरच्या गाडीची प्रतीक्षा यादी तिनशेवर गेली आहे. काही जण तर आत्तापासूनच परतीच्या प्रवासासाठीचीही तिकिटे खरेदी करताना दिवसात आहेत. 14 तारखेपासून पुढील आठवड्याचे आरक्षण देखील फुल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्याप कमी झालेली नाही. सध्या कोकण रेल्वेने येणार्‍या लोकांची कसुन तपासणी केली जात आहे. राज्य शासनाकडून गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोकणासाठी वेगळी नियमावली तयार करावी लागणार असल्याचे दिसत आहे.