कोकणात उद्योजक निर्माण व्हायला हवेत: ना. नारायण राणे

रत्नागिरी:- गोव्यासारखे निसर्ग सौदर्य रत्नागिरी जिल्ह्यात आहे. येथे मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती आहे. त्याचा उपयोग करुन येथील तरुण-तरुणी आपली संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करत नाहीत. केंद्रात मी एमएसएमईचा मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक उद्योजक, तरुण दिल्लीमध्ये भेटण्यासाठी आले. परंतु कोकणातील दोन जिल्ह्यांमधील एकही उद्योजक किंवा तरुण, उद्योग सुरु करण्यासाठी भेटायला आला नाही ही आपल्याला खंत आहे. अदानी, अंबानीं सारखे उद्योजक कोकणात निर्माण व्हायला हवेत अशी आपली इच्छा असून जास्तीत युवा पिढीने उद्योग व्यवसाय सुरु करावेत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे यांनी केले.

एमएसएमई मंत्रालयाच्यावतीने आयोजित रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचा शुभारंभ ना.राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर माजी खा. निलेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, एमएसएमई डीएफओ नागपूरचे संचालक पी. एम. पारलेवार, खादी गÏामद्योग आयोगाचे सीईओ विनीत कुमार, एमएसएमईच्या डि.आय.जी. अनुजा बापट, डिएफओचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट, एमएसएमईचे सहसंचालक अमित तमारिया, सहसंचालक गौरव कटारिया, मनोज शर्मा, सहा. संचालक व्ही. व्ही. खरे, राहूल मिश्रा, क्वायरबोर्ड मुंबई विभागीय संचालक गीता भोईर, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, पी.एम. विश्वकर्मा रत्नागिरीचे सदस्य अशोक मयेकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरीमध्ये क्लस्टरचा प्रस्ताव तयार करा, आवश्यक ते सर्व सहकार्य आपण देण्यास तयार आहोत. रत्नागिरीसाठी ट्रेनिंग सेंटर देतो, ज्याचा फायदा नवीन उद्योग निर्माण होण्यासाठी होईल. मात्र हे ट्रेनिंग सेंटर व्हावे यासाठीही कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे असे ना. राणे यांनी सांगितले.

हा महोत्सव कोणत्याही राजकीय पक्षासाठी, जातीसाठी नसून रत्नागिरीकरांसाठी आहे. एमएसएमईच्या माध्यमातून येथील नागरिकांची प्रगती व्हावी येवढीच आपली भावना आहे. रत्नागिरीकरांचे दरडोई उत्पन्न किती तर एक लाख र्चौर्याऐंशी हजार रुपये, सिंधुदुर्गचेही त्याहून अधिक आहे. गोव्याचे सव्वाचार लाखाहून अधिक असून, गोव्या सारखेच निसर्ग सौंदर्य, नैसर्गिक साधनसंपत्ती रत्नागिरीत आहे. परंतु एवढे असूनही संपत्ती वाढलेली नाही. आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत जवळपास सात कोटी उद्योग असून १५ ते १६ कोटी कामगार आहेत. देशाच्या जीडीपीत ३० टक्के आपल्या मंत्रालयाचा वाटा असून निर्यात जवळपास ४९ टक्के आहे. आपल्या अखत्यारीत एवढे उद्योग असूनही रत्नागिरीतील उद्योग कमी असल्याबद्दल ना.राणे यांनी खंत व्यक्त केली.
व्यवसाय करुनच माणसाची वृध्दी होत असते. आपण शुन्यातून उद्योग व्यवसाय निर्माण केले. अगदी आताही मंत्री असतानाही उद्योग व्यवसाय सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात अफाट बुध्दीमत्ता आहे. परंतु तिचा वापर उत्कर्षासाठी व्यवसायासाठी का करीत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कमी अर्थार्जनामुळे येथील जनता आर्थिक अडचणीत असल्याचे सांगाताना, शेतीव्यवसायावर येथील नागरिकांनी भर दिला पाहिजे. आंबा, काजू, फणस, जांभूळ, चहापाती यातून मोठे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.

फणसाची बी आपण खातो तरी किंवा गुरांना टाकून देतो. परंतु त्या बी पासून बनवलेल्या पावडरे अनेक पदार्थ तयार होतात, त्यामध्ये डायबेटीसला प्रतिरोध करतील अशी तत्व असतात. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करुन उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, त्यासाठी आपले मंत्रालय सर्वातोपरी मदत करायला तयार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.

सध्या महिलांचा उद्योग व्यवसायात २० टक्केच हिस्सा असून तो ४० टक्के झाला पाहिजे. महिलांसाठी विविध योजना मंत्रालयातर्फे राबवल्या जात असून, त्याचा फायदा घेऊन महिलांनी उद्योगिनी बनावे अशा भावना ना. राणे यांनी व्यक्त केल्या.मी प्रगतीचा भोक्ता आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जास्त पैसा मिळवा, योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि व्यसने टाळा, व्यसनाने माणून अधोगतीकडे जात असल्याचे ना. राणे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांची जयंती असून, महाराजांमधील गूण आत्मसात करायचे प्रयत्न करा, खरेतर महाराजांच्या गुणांची आज देशाला गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ५४ योजना आणल्या आहेत. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था ११व्या स्थानी होती, आता ती ५ व्या नंबरवर असून सन २०३० मध्ये ती तिसर्‍या नंबरवर न्हायची असल्याचे स्वप्न त्यांनी पाहिले असून, आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे असे आवाहनही ना. राणे यांनी केले.