रत्नागिरी:- कोकणात पसरलेल्या विस्तीर्ण कनारपट्टी भागात समुद्री गवत आणि सागरी शैवाल शेतीसंदर्भात अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार कोकणातील पाचही जिल्ह्यात किनारी भागात शैवाल शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगटाद्वारे आराखडा तयार करणार आहे. यामध्ये शेेतकर्यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येणार असून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
समुद्रीगवत व शैवाल शेती ही मातीविना शेतीचा प्रकार आहे. त्यासाठी लागवड करण्यात येणार्या बहुतेक एकपेशीय वनस्पती या सूक्ष्मशैवलांच्या श्रेणीत मोडतात. त्याला फाइटोप्लॅक्टन मायक्रोफॉइट्स किंवा प्लॅक्टोनिक शैवाळ असे संबोधले जाते. शैवाल शेतीमध्ये मॅक्रो म्हणजे मोठ्या आकाराची शेवाळे असून, त्यांची लागवड आणि कापणी केली जाते. या शैवालांचा व्यावसायिक आणि औद्योगिक वापर देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेच्या 2019 च्या अहवालानुसार भारतात समुद्री शैवलाचे उत्पादन हे 18 हजार 400 टन एवढे होते. समुद्रीगवत आणि शैवाल शेती कार्बन उत्सर्जन कमी करण्यास लाभदायक आहे. सांडपाणी प्रक्रिया, जैवइंधन व औद्योगिक वापरात याची उपयुक्तता आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव हे अभ्यास गटाचे अध्यक्ष असतील. उपसचिव (मत्स्यव्यवसाय) हे सचिव असतील. प्रधान सचिव (कृषी), प्रधान सचिव (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग), आयुक्त(मत्स्यव्यवसाय), आयुक्त (कृषी), केंद्रीय क्षार व खारे रसायन संशोधन (भावनगर) गुजरात, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधी व सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) हे या अभ्यास गटाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.