रत्नागिरी:- शासनाकडून कोकणातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 50 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 20 कोटी 75 लाख 70 हजार इतका निधी वितरणासाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 31 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये करण्यात येणार्या जिल्हास्तरावरील नवीन कामांना मान्यता देवून शासनाने निधी वितरणास मान्यता दिली आहे.
कोकणातील रत्नागिरी , रायगड आणि सिंधदुर्ग हे जिल्हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हे आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रातिनिधिक जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
समृध्द सागरी किनारा व निसर्ग संपदा हा प्लस पॉईंट असलेले कोकण आता जागतिक स्तरावरवीरल पंसतीचे पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ब्रँडिंग सुरू केले आहे. तसेच प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळेही कोकणात आहेत. येथील पर्यटनविकासाठी शासनाने 50 कोटी रुपयांच्या निधीला मान्य देण्यात आली आहे.
कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मान्यता मिळालेल्या निधीतून प्राधान्याने योजना राबविण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण, स्वच्छता, साहसी क्रीडा प्रकार यासह रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यालाही विकास निधीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी घातलेले काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार पर्यटनस्थळे, स्पा, उपहारगृहे, वॉटरपार्क, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे-ऑनलाईन तिकीट वितरित करणारी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे त्यांच्या नियमित वेळेनुसार खुली राहतील. पर्यटनस्थळांना भेट देणार्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. कोरोना नियमांचे पालन पर्यटकांनी करण्याचे आवाहन येथील प्रादेशिक एमटीडीसी प्रशासनाने केले आहे.









