कोकणनगर येथे महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- कोकणनगर येथे पतीला डबा घेऊन येणाऱ्या पत्नीला दोघा संशयितांनी मारहाण व दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर मोहम्मंद मजगांवकर (३६, रा. किर्तीनगर, रत्नागिरी) व झहीर मोहम्मंद मजगावकर (वय ४७, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी रात्री सातच्या सुमारास कोकणनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या आपल्या पतीला डबा घेऊन घरी आल्या होत्या. त्यावेळी तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुले झहीर मजगावकर व जुबेर मजगावकर हे तेथे हजर होते. तिला पाहून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तू जेवणाचा डबा घेऊन यायचं नाही असे खडसावले. त्यावेळी त्यांनी तुमचा काही संबंध नाही मी त्यांची पत्नी आहे असे सांगितले. याचा राग मनात धरुन संशयितांनी फिर्यादी महिलेला हाताच्या थापटाने व डाव्या हातावर लाकडी दांड्याने मारुन दुखापत केली. या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.