एलसीबीची धडक कारवाई
रत्नागिरी:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोकणनगर येथे ‘गांजा’ सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दि. ०८/१२/२०२५ रोजी रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलींग करत होते. कोकणनगर येथील कब्रास्थानच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाल करत असलेल्या एका इसमाला पथकाने पाहिले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला योग्य बळाचा वापर करून दुपारी ०२:३० वाजता ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष केलेल्या झडतीमध्ये त्याने आपले नाव रईस सईद खान (वय ३२, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे सांगितले. त्याच्याकडील पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये काळपट हिरवट रंगाचा, उग्रवासाचा २०४ ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ सदृश्य अंमली पदार्थ असलेल्या १३ पारदर्शक प्लॅस्टिक पाऊच/पिशव्या मिळून आल्या.
यासोबतच, अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी वापरला जाणारा एक डिजिटल वजन काटा, दोन मोबाईल फोन आणि रोख ₹३,५०० जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ आणि इतर वस्तूंसह एकूण ₹४९,७००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आरोपी रईस सईद खान याने ‘गांजा’ विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५४/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब) ii (अ) खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.









