कोकणचा राजा ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात!

वाशी मार्केटमधील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर

रत्नागिरी:- हापूस आंब्याला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हापूस आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आलेली आह. सध्या २ हजारपासून ६ हजार रूपयांपर्यंतचा दर पाच ते सात डझनच्या पेटीला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा येत्या चार दिवसात संपुष्टात येईल आणि त्यानंतर पुन्हा दहा दिवस बाजारातील आंबा पेट्यांची आवक कमी होईल असा बागायतदारांचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या पेटीला बाजारात मिळत असलेला दर स्थिर राहील, अशी अपेक्षा बागायतदारांकडून केली जात आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतून वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, यंदाची स्थिती चिंताजनक आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात वाशी मार्केटमध्ये साधारणपणे ६० हजार ते १ लाख हापूसच्या पेट्या दाखल होतात. मात्र, यंदा केवळ ३४ हजार पेट्याच बाजारात आल्या आहेत. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही बाजारात केवळ ५ हजार पेट्यांची आवक झाली. सणासुदीच्या काळात मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. कोकणात एकूण १ लाख २४ हजार ५७१ हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आहे. मात्र, यंदा हवामानातील बदल, लांबलेला पाऊस आणि त्यानंतर वाढलेला उन्हाचा तडाखा यामुळे आंब्याच्या मोहोरावर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम झाला. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली असून बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.


दिवस स्थिर राहण्याची बागायतदारांना आशा

वाशी मार्केटमधील आवक कमी असल्याने हापूसचे दर सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पाच ते सात डझनच्या पेटीला २ हजार रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत दर आकारावे लागत आहेत. आवक कमी असल्यामुळे हे दर अजून काही दिवस स्थिर राहतील अशी बागायतदारांना आशा आहे. आहे. एकीकडे उत्पादनाचे घटलेले प्रमाण आणि दुसरीकडे वाढलेली महागाई, अशा दुहेरी संकटात यंदा कोकणचा हापूस उत्पादक सापडला आहे.