कोंडगाव कातळवाडी येथे वॅगनार – ट्रकच्या अपघातात एक जखमी

वॅगनार चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर संगमेश्वर कोंडगाव येथे वॅगनार कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात वॅगनार चालक जखमी झाल्याची घटना सोमवार 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज मंगेश जागुष्टे (35, ओझरेखुर्द गणेशवाडी, संगमेश्वर) असे जखमी झालेल्या वॅगनार चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार सर्जेराव गायकवाड यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जागुष्टे हा आपल्या ताब्यातील वॅनगार घेवून कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कोंडगाव कातळवाडी येथे विरुध्द दिशेला जावून ट्रकला जोरदार धडक दिली. हा ट्रक रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. समोरुन धडक दिल्याने दोन्ही गाडयांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. या अपघातात वॅगनार चालक मनोज जागुष्टे हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर देवरुख पोलीस स्थानकात भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.