केळंबे येथे भावोजीच्या घरात मेहुण्याने केली तीन लाखांची चोरी

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील केळंबे येथील नामदेवनगर परिसरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. फिर्यादी युवराज गणपती जाधव यांचे सख्खे मेहुणे राज नारायण राठोड (वय २४) यांनीच घरातून सोन्याची अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना ०४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.०० वाजल्यापासून ०५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादी यवराज जाधव हे बेळगाव येथे गेले असताना, त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपी राज नारायण राठोड याने त्यांच्या केळंबे, घर नं. ७६४, अमृतसृष्टी नामदेवनगर येथील घरातून चोरी केली.

चोरलेल्या ऐवजामध्ये ४१,१५० रुपये किमतीची अंदाजे अर्धा तोळा वजनाची तीन पिळांची सोन्याची अंगठी, १५,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा व्ही ३० मॉडेलचा ५ जी (फिकट आकाशी रंगाचा) मोबाईल फोन, आणि २,८०,००० रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. रोख रकमेमध्ये ५०० रुपयांच्या दराचे ५०,००० रुपयांचे चार बंडल आणि ८०,००० रुपयांचे एक बंडल होते.

आरोपी नातेवाईक असल्याने फिर्यादींनी तो परत येईल या आशेने त्याची आजपर्यंत वाट पाहिली. मात्र, तो परत न आल्याने आणि चोरी झाल्याची खात्री पटल्याने, १७जून २०२५ रोजी रात्री ९.३२ वाजता लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. लांजा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गु.र.नं. १२१/२०२५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध सुरु आहे.