जि. प. सभा; अधिकाऱ्यांना तंबी
रत्नागिरी:- शेतकर्यांसाठी योजना राबविताना महावितरण चालढकल करत असल्याचा ठपका सदस्यांनी सर्वसाधारण सभेत ठेवला. कृषी पंप योजनेत 450 पैकी 250 जोडण्या देण्यासाठी दोन वर्षे लागणार असतील तर उर्वरित दोनशेसाठी मार्चपर्यंत कशा पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित करत संतोष गोवळे, संताष थेराडेंसह सदस्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना धारेवर धरले. यावर अध्यक्ष रोहन बनेंनीही अधिकार्यांना तंबी देत दोन महिन्यांचे नियोजन सादर करा असे आदेश दिले.
रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, आरोग्य सभापती बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड उपस्थित होते. महावितरणकडील प्रश्नांवर चर्चा करताना गोवळे यांनी कृषीपंप जोडण्या देण्यात चालढकल होत असल्याचे सांगितले. या जोडण्यांसाठी शेतकर्यांना माहिती दिली जात नाहीत. यावर अधिकारी म्हणाले की योजना राबविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला 30 कोटी रुपये मार्च 2018 ला मंजूर झाले. 31 मार्च 2021 पर्यंत आलेेले प्रस्तावाची कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यानंतर मागेल त्याला पंप जोडणी द्यावयाची आहे.
दोन वर्षात पन्नास टक्केही काम पूर्ण न करणार्या महावितरणला तिन महिन्यात दोनशे जोडण्या कशा पूर्ण करणार असा प्रश्न ढवळे यांनी विचारला. त्यावर अधिकारी अनुत्तरीत. पैसे आहेत पण मानसिकता नाही ती अधिकार्यांनी बदलली पाहीजे. तरच शेतकर्यांना न्याय मिळेल असे त्यांनी बजावले. विज गेली की लाईन कट करण्यासाठी अधिकारी धाव घेतात. पण योजनेची माहीती देण्यासाठी, त्याची पूर्तता करण्यात महाविरण चालढकल करते. तळागाळातील अधिकारी मग्रुरीने वागत असतील तर ते योग्य नाही असे थेराडे यांनी सुनावले. कृषी पंप योजना शेतकर्यांपर्यंत पोचलेली नाही, त्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत अशा सुचना बाबू म्हाप यांनी दिल्या. तर परशुराम कदम यांनी पाली येथील एका विजबिलावरुन अधिकार्यांची झाडाझडती घेतली. चार महिन्याचे बिल साडेआठ हजार रुपये आले. त्याबाबत पाली येथील अधिकारी सामान्यांना भेटच व्यवस्थित माहिती देत नाहीत. या प्रश्नावरही अधिकार्यांना उत्तर देता आले नाही. यावर अध्यक्ष बने यांनी तोडगा काढत महावितरणचे प्रश्न घेऊन सोमवारी अधिकार्यांसह दालनात बैठक घेण्याच्या सुचना दिल्या.
राजापूर तालुक्यातील पणंदेरी येथे वीज जोडण्या दिलेल्या नाहीत. जवळच्या बागायतदारांपर्यंत वीज पोचली असे दिपक नागले विचारले. याचा सर्वसामान्याना नाहक त्रास होत आहे. तेथील अधिकारी आश्वासनांच्या पलिकडे काहीच काम करत नाही. यावर कार्यवाही करा अन्यथा अधिकारी बदला अशी मागणी त्यांनी केली. आठ दिवसात कार्यवाहीचे आश्वासन अधिकार्यांनी दिले.