कुर्ली समुद्र किनाऱ्यानजिक दोन गटात राडा; परस्पर विरोधी तक्रारी दाखल 

रत्नागिरी:- कुर्ली समुद्र किनारी दोन गट भिडले. किरकोळ कारणातून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोमवार 4 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी राजन तोडणकर, विवेक तोडणकर, सुशांत तोडणकर, देवेंद्र तोडणकर, प्रसाद तोडणकर, भाउ तोडणकर, सागर तोडणकर (सर्व रा.कुर्ली,रत्नागिरी) यांच्याविरोधात विकास तुकाराम चव्हाण (48,रा. जेलरोड,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानूसार,सोमवारी रात्री विकास चव्हाण व त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना कुर्ली ते रत्नागिरी येत असताना संशयितांनी अडवून दारु पिउन दंगा का करता असे विचारले. तेव्हा विकास चव्हाण यांच्या मुलाच्या मित्रांनी त्याची व्हिडीओ शूटिंग केली म्हणून संशयितांनी त्यांना मारण्यास सुरुवात केली. तेव्हा विकास चव्हाण व त्यांचा मुलगा मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

तसेच याप्रकरणी सुशांत सुभाष तोडणकर (31,रा.कुर्ली,रत्नागिरी) यांनी परस्पर विरोधी तक्रार देताना बाबू चव्हाण (रा.बेलबाग,रत्नागिरी) विरोधात तक्रार दिली आहे.त्यानूसार,सोमवारी रात्री ते आणि त्यांचे नातेवाईक शतपावली करण्यासाठी कुर्ली बिचवर गेले होते.त्यावेळी बाबू चव्हाण बेदरकारपणे आपल्या ताब्यातील नॅनो कार (एमएच-03-एडब्ल्यू-5475) घेउन जात असताना सुशांत तोडणकर यांच्या पायाला घासून गेल्याने त्यांना दुखापत झाली.तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही जाणीवपूर्वक दुखापत करुन शिवीगाळ करत तुला बघून घेतो अशी धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल प्रवीण बेंदरकर करत आहेत.