गुहागर:- तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळून त्याखाली अडकून एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे. या दुर्घटनेत ठार झालेल्या बैलासह जखमी ६ जनावरे बाहेर काढण्यात आली आहेत.
घटना घडताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच साकवाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचविण्याचा प्रयत्न करत असले तरी लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात आले असून संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. आवश्यक यंत्रसामग्रीसह जेसीबी मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा लोखंडी पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून अधिकारी नुकतेच पाहणी करून गेले होते. मात्र त्याआधीच हा पूल कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या साकवावरून गावातील नागरिक, शेतकरी आणि जनावरे नियमितपणे ये-जा करत होते. गावाच्या पलीकडे शेती असल्याने तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही हाच मार्ग महत्त्वाचा होता. पर्यायी रस्ता नसल्यामुळे याच साकवावर संपूर्ण गाव अवलंबून होते. पूल यापूर्वीही धोकादायक झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या साहाय्याने तो उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पुलाबाबत आवश्यक कार्यवाही न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, बचावकार्य सुरू असून पुलाखाली अडकलेल्या सर्व जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.









