कुंभार्ली घाटात 11 बैलांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण:- जिल्ह्यात अवैध गुरांची केल्याच्या वाहतुकीच्या घटना वाढत आहे. पोलिसाना चकवा देत रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असते. कुंभार्ली घाटमार्गे गुरांची चोरटी वाहतूक होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्यातील खडपोली येथे तब्बल ११ बैल अवैधरित्या ट्रकमध्ये भरत असताना शिरगाव पोलिसांनी धाड टाकून एक ट्रक पकडला. याप्रकरणी पाच जणांवर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कादवड येथील एका ट्रकमध्ये ११ बैल खडपोली येथे भरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओमकार बापट यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ शिरगाव पोलिसांजवळ संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार एएसआय संजय जाधव, हवालदार अशोक शिंगटे, हरिश्चंद्र पडवळ, पांडुरंग पाटील, चालक धामापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन गुरांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक चालक याला  शिताफीने पकडले. यावेळी मोजम जमाल चौघुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर शाहीद आदम चौघुले, जमाल हसन चौघुले, अमीन वजीर चौघुले, इब्राहिम चौघुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हेड कॉन्स्टेबल कोलेकर करीत आहेत.