Friday, July 3, 2026
spot_img
Home चिपळूण कुंभार्ली घाटात मुसळधार पावसाने सुमारे २० फूट रस्ता खचला

कुंभार्ली घाटात मुसळधार पावसाने सुमारे २० फूट रस्ता खचला

वाहनचालकांचा जीव टांगणीला!

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या पायाखालची माती पहिल्याच पावसात वाहून जाण्याची घटना समोर येत असतानाच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुंभार्ली घाटात मुसळधार पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील एका अतिधोकादायक वळणावर सुमारे २० फूट रस्ता खचला असून, रस्त्याखालची मातीही सरकू लागल्याने हा भाग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी जून महिना पावसाअभावी कोरडा गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर जून महिना संपता- संपता पावसाचे आगमन झाले आणि गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणावर परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर घाट आणि महामार्ग सुरक्षित रहावा तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी व्हावा, म्हणून परशुराम घाटात गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात गॅबियन वॉलची पायाखालची माती वाहून गेल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. कुंभार्ली घाटात रस्ता खचला असल्याचे समोर आले आहे. या खचलेल्या रस्त्यामुळे अवजड वाहने, एसटी बस तसेच अन्य वाहनांची वाहतूक मोठ्या जोखमीची बनली असून, संबंधित ठिकाणी वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.
यापूर्वीही घाटातील काही धोकादायक वळणांवर कायमस्वरूपी संरक्षक भिंती उभारण्याऐवजी केवळ पिंपे ठेवून तात्पुरती सुरक्षितता करण्यात आल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा आणि आवश्यक तेथे वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.