संगमेश्वर:- तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक हुंबरटवाडी येथे एका घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजेंद्र काशिराम सुर्वे (वय ५४) या व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंबरटवाडी येथील एका घराच्या पडवीमध्ये अवैध दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता, विविध कंपन्यांच्या देशी आणि विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये इम्पेरियल ब्लू, ब्लॅक डीएसपी, रोमानोव्ह, हेवर्ड्स फाईन व्हिस्की, मॅकडॉवेल्स नंबर १ (व्हिस्की आणि रम), ओल्ड मॉ Monk रम आणि रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग तसेच जीएम एक नंबर संत्रा या कंपन्यांच्या १८० मिली आणि ३७५ मिलीच्या बाटल्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत १२ हजार ३३५ रुपये इतकी आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.