कुंपण तोडल्याच्या वादातून पेंडखलेचे सरपंचावर कोयत्याने हल्ला

राजापूर:- जमीनी भोवती घातलेले कुंपण का तोडले असा जाब विचारल्याने पेंडखलेचे सरपंच राजेश हरीचंद्र गुरव (वय ५०) यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. ४) सकाळी साडे आठच्या दरम्यान पेंडखेल वठारवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेंडखले गावचे सरपंच राजेश हरीश्चंद्र गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमीनी भोवती कुंपण घातलेले आहे. हे कुंपण त्याच गावातील दत्ताराम महादेव सुर्वे उर्फ डी एम सुर्वे हे तोडीत होते. दरम्यान सरपंच गुरव यांनी सुर्वे यांना हे कुंपण तोडल्याचा जाब विचारला. यावेळी दोघांत किरकोळ वाद झाला. दरम्यान सुर्वे यांनी सरपंच गुरव यांच्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि खांद्यावर जखम झाली. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील सरपंच गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तिथून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले.

सरपंच गुरव यांच्यावर हल्ला करणारे दत्ताराम सुर्वे यांच्या विरुध्द भादवि कलम ३२४ ,५०४ ,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणात दत्ताराम सुर्वे यांच्या पत्नीला धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडून पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉंस्टेबल के एस पाटील अधिक तपास करीत आहेत.