Wednesday, September 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास

किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास

मंडणगड दहागाव येथील घटना

मंडणगड:- तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्यापूर्वीच्या कालावधीत घडली. दुकान बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दुकानावरील सिमेंट पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी दुकानमालक सिकंदर इसाक जोगीलकर (वय ५६, रा. दहागाव स्टॉप, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (४), ३०५ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५३ वाजता दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.