लांजा:- तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी चक्रावे वेगाने फिरवली. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक १९ जानेवारी रोजी सुरेश पडये यांचा मृतदेह त्यांच्या घरात कुजलेल्या स्थितीत सापडला होता. सुरुवातीला लांजा पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळावर सांडलेले रक्त पाहून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी हा घातपाताचा प्रकार ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात गोपनीय माहिती गोळा केली. संशयावरून नंदकुमार रविंद्र पांचाळ (वय २५, रा. कुर्णे सुतारवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरेश पडये आणि आरोपी नंदकुमार हे मित्र होते. मात्र, सुरेश यांनी आपल्याला शिवीगाळ केली, या रागातून नंदकुमारने सुरेश यांच्या घरातच त्यांच्यावर वार करून त्यांना जिवे ठार मारले. याप्रकरणी आता लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









