दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव रोहिदासवाडी येथे किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुरेश जालगावकर व मयूर जालगावकर (जालगाव- रोहिदासवाडी) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश जालगावकर हे त्यांच्या घराच्या आवारात बसले तेव्हा त्यांचा भाऊ सुरेश जालगावकर याने तेथे येऊन मंगेश यास ‘तू माझ्या आंब्याच्या झाडावरचे आंबे का काढलेस’ असे बोलून जालगाव येथील मंगेश याला मारहाण केली. त्यामुळे मंगेश याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी सुरेशने मंगेशला लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तेव्हा मंगेश याची पत्नी पूजा ही सोडवण्यासाठी पुढे आली असता सुरेशने तिला ढकलून दिले. त्यानंतर सुरेश व मयूर जालगावकर या दोघांनी तिला दगडाने मारहाण केली. यामध्ये पूजा जखमी झाली. तसेच मंगेश याच्या घरावर दगड फेकून मारून त्याच्या घराचे नुकसान केले. तसेच सुरेशने घराचे कंपाउंड तोडून नुकसान केले व त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुरेश जालगावकर व मयूर जालगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.









