किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण

उद्यमनगर येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला किरकोळ कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहद मुस्ताक पाटणकर (रा. शिवाजीनगर), अयान मुल्ला (पुर्ण नाव गाव माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास उद्यमनगर रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल समिर सोलकर (वय २६, रा. आरियाना गृहनिर्माण सोसायटी, शेट्येनगर-रत्नागिरी) हे रिक्षा (क्र.एमएच-०८ बीसी ०१५०) घेऊन ओसवालनगर ते हयातनगर रिक्षा स्टॉप येथे जात असताना खलपे हाऊस-उद्यमनगर येथे आले असताना संशयित फहद व अयान मुल्ला हे दुचाकी घेऊन जात असताना फिर्यादी यांना कट मारला. गाडीवरुनच फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली व तू चंपक मैदानात ये मग तुला बघतो असे सांगितले व निघून गेले. पुन्हा संशयितांनी कबाब कॉर्नर-उद्यमनगर येथे रिक्षाला ओव्हरटेक करुन फिर्यादी यांच्यासमोर दुचाकी आडवी लावली त्यावेळी फिर्यादी सोलकर यांनी काय फालतुगिरी आहे असे विचारले असता संशयितानी लाथाबुक्यांनी मारहाण केली. संशयित फहद पाटणकर याने लोखंडी रॉडने मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी साहिल सोलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.