दापोली:- तालुक्यातील निगडे उजाळवाडी येथे क्षुल्लक कारणावरून सासू सासरे अशा दोघांवर सुरीने वार करून जखमी केल्याप्रकरणी जावया विरोधात
दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंत जोशी हे सोमवार २४ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरी होते. त्यांचा जावई सुभाष पाते (४६) हा घरी दारू पिऊन आला आणि म्हणाला की, त्याची बायको कुठे आहे. तेव्हा जोशी यांनी सांगितले की, मला तुझी बायको कुठे आहे माहीत नाही. तुम्ही तुमच्या वकिलांना विचारा. या गोष्टीचा राग येऊन आरोपी सुभाष पाते याने आपल्या खिशातून आणलेली सुरी काढून जोशी यांच्या अंगावर उगारली तेव्हा जोशी यांनी दोन्ही हात वाचवण्यासाठी पुढे केले. त्यावेळी ही सुरी ही जोशी यांच्या उजव्या हाताचा अंगठा तसेच डाव्या हाताच्या तीन बोटांना लागून दुखापत झाली. जोशी यांची पत्नी रूपाली ही देखील सोडवण्याकरता मध्ये आली असता, तिच्याही उजव्या हाताच्या तळहात व डाव्या हाताच्या मनगटावर सुरीचा मार लागून दुखापत झाली. यावेळी आरोपी सुभाष पाते याने तुला आज सोडणार नाही, तुझा शेवट करतो, ठार मारतो, अशी धमकी दिली म्हणून जोशी यांनी तक्रार दाखल केली.