चिपळूण मार्गताम्हाने-गोपळवाडी येथील घटना
चिपळूण:- वडिलांना मारहाण करतेवेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी मार्गताम्हाने-गोपळवाडी येथे घडली. याप्रकरणी तरुण जखमी झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश भिवा जाधव (४५), मोहन भिवा जाधव (५५), प्रतिक प्रकाश जाधव (२५, सर्व मार्गताम्हाने) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याबाबतची फिर्याद गणेश विनायक तावडे (३०, मार्गताम्हाणे-गोपळवाडी) याने दिली असून तो या मारहाणीत जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गणेश याचे वडील हे त्याच्या घरी जाताना ते सिद्धेश तावडे यांच्या म्हशीच्या वाड्यासमोरील रस्त्यावर आले असताना प्रकाश जाधव, मोहन जाधव, प्रतिक जाधव हे तिघे तेथे आले. यातील प्रकाश याने तुम्ही असेच व्यवहार करता का असे बोलून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी गणेश हा वाद सोडवण्याकरता गेला असताना त्याला प्रतिक याने म्हैस राखण्यासाठी वापरातील लाकडी काठी गणेशच्या डोक्यात घातली, तर मोहन याने देखील मारहाण केली. या काठीच्या मारहाणीमुळे गणेशला दुखापत झाली आहे.