राजापूर:- तालुक्यातील नाटे येथे सार्वजनिक आंब्याच्या झाडावरील आंबे काढण्यास विरोध केल्याने चुलत पुतण्याने कोयतीने काकावर वार केल्याची घटना घडली. ही घटना २२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या चुलत पुतण्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी अनिल शिवाजी कोंडेकर (वय ६३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत पुतण्या आरोपी प्रज्योत प्रकाश कोंडेकर हा त्यांच्या सार्वजनिक आंब्याच्या झाडावरील आंबे काढत होता. फिर्यादी यांनी त्याला ‘थोडे आंबे माझ्या मुलांसाठी ठेव’ असे सांगितल्यावर आरोपीला राग आला. त्याने फिर्यादी यांना ढकलून शिवीगाळ केली आणि त्याच्या हातात असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या दोन्ही हातांच्या अंगठ्यांवर तसेच दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर मारून दुखापत केली. आरोपीने फिर्यादीला ठार मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत दुखापत झाल्याने अनिल कोंडेकर यांना २३ एप्रिल रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(२), ३५१(२) आणि ३२३ अन्वये आरोपी प्रज्योत प्रकाश कोंडेकर (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.