रत्नागिरी:- जिल्ह्यातील किनारी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून सुमारे सात कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. कामे मंजूर झालेल्या निधीतून पर्यटन स्थळे व तेथील भौतिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
तालुक्यातील अंतर्गत स्थळांसाठी मोठा निधी मिळत असला तरी या निधीमध्ये समुद्रकिनारा, गड-किल्ले पर्यटनासाठी तरतूद नाही. पर्यटन विकास योजनेतून जिल्ह्यात 29 कामांचा विकास व विस्तार होणार आहे. यासाठी सहा कोटी 81 लाख 70 हजाराचा निधी मंजूर झाला आहे.
पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण, तिथे जाणारे रस्ते, पेव्हर ब्लॉक, वाहनतळ शेड, मूलभूत सुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर सोयींचा यात समावेश आहे. तसेच सुरक्षा भिंत, कुंपणासाठीही निधी वापरला जाणार आहे.विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळाला तरी पश्चिम भागातील किनारपट्टी क्षेत्रांच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. वेळणेश्वर, दापोली अशा प्रसिद्ध समुद्रपर्यटन स्थळांच्या विकासासाठी या योजनेत निधी नाही. शिवाय जिल्ह्यातील नोंदणीकृत गड किल्ले, कृषी पर्यटन विकासाकडेही दुर्लक्ष झालेले आहे. वाहनतळ साफसफाई, गरम पाण्याच्या कुंडाजवळ सपाटीकरण व रस्ता तयार करणे, संपर्क रस्त्यावर साकव बांधणे आदीसाठी यामध्ये निधी मंजूर आहे. पर्यटन स्थळाला वाहनतळ पायर्या, रेलिग, संरक्षण भिंत, स्वच्छता गृह बांधकाम करणे, पर्यटन स्थळ रस्त्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे व आवश्यक तेथे रस्त्याची सुधारणा करण आदी कामे या निधीतून प्रस्तावित आहेत.
पावसाळी पर्यटनासाठी धबधब्याला पायर्या व रेलिंग करणे, धोकादायक वळणावर संरक्षक भिंत बांधणे, सनसेट पॉईटला वाहनतळ व काँक्रीट रस्ता, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण आदी कामे केली जाणार आहेत.
पर्यटन स्थळावरील विकास कामे आणि सुधारणा यासाठी पहिल्यांदा एवढा भरघोस निधी मिळाला आहे, मात्र त्याचा विनीयोग योग्य प्रकारे केला जाण्याची गरज आहे. अलीकडेच काही पर्यटनस्थळांच्या विकासकामांमध्ये खर्चाच्या तुलनेत अत्यंत तकलादू कामे झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निधीच्या उपयोजनांवर प्रशासनाने करडी नजर ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन व्यावसायिक धनंजय नागवेकर यांनी दिली.